मुंबई - अजय-अतुल यांच्या संगीतात एक वेगळा गोडवा आहे. "विरुद्ध' या चित्रपटाच्या वेळी मला त्याची प्रचिती आली होती. त्या वेळीच त्यांच्यातील गुणवत्ता दिसली होती. आता ती राष्ट्रीय पुरस्कारामुळे सिद्ध झाली आहे. मला त्याचा आनंद वाटतो, असे उद्गार काढून अमिताभ बच्चन यांनी संगीतकार अजय-अतुल यांचे तोंडभरून कौतुक केले.
मराठी अस्मितेचा झेंडा सध्या सगळीकडे फडकत असताना आता आणखी एक मराठी पाऊल पुढे पडले आहे. संगीतकार अजय-अतुल यांनी आपल्या चाहत्यांसाठी "अजयअतुल डॉट कॉम' नावाची वेबसाईट सुरू केली आहे. वेबसाईटचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले. त्या वेळी श्री. बच्चन यांनी अजय-अतुल यांची खूप स्तुती केली. "जोगवा' या चित्रपटासाठी त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल तसेच त्यांच्या सध्या गाजत असलेल्या "नटरंग' या चित्रपटातील गाण्यांबद्दल श्री. बच्चन यांनी स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले, की या संगीतकार जोडीकडे असलेली गुणवत्ता आणि कौशल्य आपल्याला आधीच कळले होते. त्यांचे एकूणच गुण व नम्रता पाहून आपण या समारंभाला आलो आहोत. सध्या प्रादेशिक भाषांतील चित्रपटांना खूप महत्त्व आले आहे. त्यामुळे आमची कंपनी प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची निर्मिती अधिक करणार आहे, अशी माहिती अमिताभ यांनी दिली. सांताक्रूझ येथे एका पंचतारांकित हॉटेलात हा सोहळा रंगला होता. ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्यासहित हिंदीमधील काही मान्यवर मंडळी उपस्थित होती. मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक तसेच कलाकार अजय-अतुल यांचे कौतुक करायला आले होते. त्यात अभिनेते सचिन पिळगांवकर, दिग्दर्शक राजीव पाटील, अभिनेता उपेंद्र लिमये, अभिनेत्री मुक्ता बर्वे, अमृता खानविलकर, श्रीरंग गोडबोले, गुरू ठाकूर, संजय जाधव यांचा सहभाग होता.
No comments:
Post a Comment